अहमदनगर

11 कोटींचा गैरव्यवहार; ‘त्या’ संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी जेरबंद

अहमदनगर- गेल्या अनेक महिन्यांपासून पसार असलेला परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला 11 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने नगर शहरातून ताब्यात घेत अटक केली आहे. निखीलेश शिवकुमार मानुरकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

परळी पीपल्सच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये ठेवीदारांनी सुमारे 11 कोटींच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. मात्र, त्या पैशांचा योग्य विनियोग न झाल्याने सोसायटी डबघाईला आली. परिणामी, ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नाहीत. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास सुरू केला आहे.

 

यापूर्वी विश्‍वजित राजेसाहेब ठोंबरे, प्रमोद खेेडकर, अमित गोडसे यांना अटक करण्यात आलेली आहे. तर या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला संस्थापक चेअरमन नितीन सुभाष घुगे हा अद्यापही पसार आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी मानुरकर पसार होता, तो नगर शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस अंमलदार राठोड, खोमणे यांच्या पथकाने मानुरकरला ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक केली आहे.

 

दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य आरोपी चेअरमन नितीन घुगे व निखीलेश मानुरकर यांची पुण्यात सॉफ्टवेअरची कंपनी होती. त्यांना सॉफ्टवेअरचे ज्ञान असल्याने त्यांनी याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना लुबडण्यासाठी केला. परळी अर्बनमध्ये गुंतवणूक करणार्‍या ठेवीदारांच्या पैशावर डल्ला मारला. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने मानुरकरला गजाआड केले असून चेअरमन नितीन घुगे अद्यापही पसार आहे. त्याला अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button