अहमदनगर

पॅथोलॉजी लॅब चालकाची 16 लाखाची फसवणूक; डॉक्टरसह चौघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर- केडगाव येथील सुविधा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये अक्षय दत्तात्रय ढवळे (वय 28 रा. मांजरी, पुणे) यांनी पॅथोलॉजी लॅब सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी 10 लाख रूपये डिपॉझिट व लॅबमध्ये सहा लाख 56 हजार 500 रूपयांचे साहित्य ठेवले होते. ते साहित्य परस्पर विक्री करून डिपॉझिट म्हणून ठेवलेले 10 लाख रूपयेही परत न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.

 

ढवळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भालचंद्र अशोक साळवे (रा. वनकुटे ता. पारनेर), डॉ. रामेश्‍वर विठ्ठलराव बंडगर (रा. सोईट धानोरा सालदेव, जि. यवतमाळ), सचिन गुंजाळ व आयशा सय्यद (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ढवळे यांनी 13 ऑक्टोबर, 2021 रोजी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी भालचंद्र साळवे, डॉ. रामेश्‍वर बंडगर यांच्यासोबत पाच वर्षाचा करारनामा करून चेकद्वारे सहा व चार लाख रोख रक्कम डीपॉझीट देवून हॉस्पिटल येथे पॅथोलॉजी लॅब सुरू केली.

 

या लॅबमध्ये अक्षय यांनी 13 जानेवारी, 2022 रोजी सहा लाख 56 हजार 500 रूपयांचे साहित्य ठेवले होते. 4 मार्च, 2022 रोजी काही अंतरगत वादामुळे सुविधा हॉस्पिटल बंद झाले होते. त्यावेळी अक्षय यांनी लॅबमधील साहित्य काढून घेण्यासाठी विचारणा केली असता डॉ. बंडगर, साळवे, गुंजाळ यांनी उडवाउडविचे उत्तरे दिली व अक्षय यांना न सांगता करारनामा रद्द केला.

अक्षय हे 24 एप्रिल, 2022 रोजी सुविधा हॉस्पिटल येथे लॅबमधील साहित्य घेण्यासाठी गेले असता त्यांना तेथील सुपरवायझर बबन वाटोळे यांनी सांगितले आपली फसवणूक झाल्याचे अक्षय ढवळे यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button