अहमदनगर

तरूणाला दोन लाखाला ऑनलाईन चुना; अशी केली फसवणूक

अहमदनगर- अलीकडच्या काही दिवसांमध्ये नागरिकांना फसवणूकीसाठी अनेक फोन येत असून वेगवेगळे आमिष दाखवून त्यांची ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. असाच एक प्रकार जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडला. तेथील तरूणालाही क्रेडीट कार्ड बंद करण्याचा बहाणा करून दोन लाख दोन हजार 744 रूपयाला ऑनलाईन गंडा घातला गेला आहे.

 

शंकर संतु सावळे (वय 26 रा. पाचनई ता. अकोले) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी 12 सप्टेंबर, 2022 रोजी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

फिर्यादी यांना 30 ऑगस्ट रोजी दुपारी एका नंबरवरून फोन आला. फोन केलेल्या अज्ञात व्यक्तीने क्रेडीट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलतो, असे सांगितले. तुम्ही वापरत असलेल्या क्रेडीट कार्डमधील आठ हजार रूपयांचे पेमेंट भरा, असे त्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान फिर्यादी यांनी क्रेडीट कार्डचा वापर केलेला नसल्याने त्यांनी पेमेंट भरण्यास नकार दिला. त्या व्यक्तीने कार्ड बंद करण्याचा बहाणा करून फिर्यादीला ऐनिडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.

 

तसेच फिर्यादीकडील क्रेडीट, एटीएम कार्डची माहिती विचारून घेतली. फिर्यादी यांनी सर्व माहिती दिल्याने त्यांच्या खात्यातील दोन लाख दोन हजार 744 रूपये ऑनलाईन काढून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button