अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात लवकरच येणार २०० इलेक्ट्रिक बस !

राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात २०१९ मध्ये ७६६ बसगाड्यातून प्रवासी सेवा दिली जात होती. दोन वर्षांत उपलब्ध बसची संख्या कमी होऊन अवघ्या ५९९ बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची गरज पाहता, नव्याने २०० इलेक्ट्रिक बसची मागणी अहमदनगर विभागासाठी नोंदवण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढल्यानंतर प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्यात आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत एसटीची प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात एसटी महामंडळाच्या पहिल्या बसची मुहूर्तमेढ अहमदनगर येथूनच जून १९४८ मध्ये रोवली गेली होती.

एसटीने ७५ व्या वर्षांत पदार्पन केल्यानंतर पहिली शिवाई इलेक्ट्रिक बसचा नवा अध्याय नगर येथूनच १ जून २०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. नगर विभागात २०१९ पूर्वी तब्बल ७६६ बसच्या माध्यमातून सेवा दिली जात होती. दहा वर्षांहून जुन्या बसचे वेळोवेळी स्क्रॅप करण्यात आले.

कोरोना कालावधीत बसचे उत्पन्नही कमी झाले. या कालावधीत नगर विभागातील ८८ बसचे रूपांतर मालवाहक ट्रकमध्ये करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात ५९९ बसच्या माध्यमातून प्रवासी सेवा दिली जात आहे.

बसची संख्या कमी झाल्याने त्या परिणाम ग्रामीण फेऱ्यांवरही झाला आहे. आता नव्याने २०० इलेक्ट्रिकबसची मागणी महामंडळस्तरावर आहे. या बस उपलब्ध झाल्यास प्रदुषण कमी होऊन, मुबलक बस उपलब्ध होणार आहेत.

दोन शिवाई बसच्या माध्यमातून नगर-पुणे प्रवासी सेवा
सद्यस्थितीत दोन शिवाई बसच्या माध्यमातून नगर-पुणे प्रवासी सेवा दिली जात आहे. जूनमध्ये ही सेवा सुरू झाली, त्यावेळी एक बस नगर विभागाकडे होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही गाडी पुणे विभागाकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत नगर विभागात इलेक्ट्रिक बस नसली, तरी याच बसमधून नगर-पुणे नियमित प्रवासी सेवा सुरू आहे.

चार्जिंग पॉइंटची तयारी
शहरात महापालिकेत इलेक्ट्रिक शिवाई बसगाडीच्या चार्जिंगची व्यवस्था आहे. तसेच नव्याने तारकपूर आगारातही चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येत आहे. या स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून, या ठिकाणी एकाचवेळी चार गाड्यांना चार्जींगची सुविधा उपलब्ध होईल. तसेच गाड्यांची सख्या वाढेल, त्याप्रमाणात व्यवस्थाही उभी केली जाणार आहे.

दररोज सरासरी दोन गाड्या दुरूस्तीसाठी
सद्यस्थितीत ५९९ बस उपलब्ध असल्या तरी, दरवर्षी वाहनांची पासिंग करण्यासाठी बसची डागडुजीसह रंगरंगोटी करावी लागते. त्याचबरोबर ११ डेपोंतील दररोज सरासरी दोन गाड्या दुरूस्तीसाठी असतात. त्यानुसार दररोज सुमारे ४० ते ४५ गाड्या दुरूस्तीसाठी उभ्या असल्याने, प्रत्यक्षात ५५० गाड्याच सेवेसाठी उपलब्ध राहतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button