अहमदनगर

एकाच कुटूंबातील तिघांवर 29 गंभीर गुन्हे; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर – एकाच कुटूंबातील तिघांविरूध्द जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे 29 गुन्हे दाखल आहेत. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मंगळवारी पहाटे कामरगाव (ता. नगर) शिवारातून ताब्यात घेत अटक केली. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

 

रमेश सावत्या ऊर्फ सावंत भोसले (वय 31), अविनाश सावंत ऊर्फ सावत्या भोसले (वय 19) व रमेशची पत्नी (सर्व रा. पिंपळगाव कौंडा ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी नेप्ती बीट अंमलदार भरत बाजीराव धुमाळ हे कामरगाव शिवारात गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर लाकडी दांडके, दगडाने हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. 17 नोव्हेंबर, 2021 रोजी ही घटना घडली होती.

 

अंमलदार धुमाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे सर्व जण पसार होते. दोन दिवसापूर्वी रमेश भोसले, अविनाश भोसले यांनी तिघांवर तलवार, गज, कत्तीने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर आरोपी कामरगाव शिवारात असल्याची माहिती पोलिसांनी काढली. पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकांनी मंगळवारी पहाटे कामरगाव शिवारात सापळा लावून मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button