अहमदनगर

एलसीबीच्या जाळ्यात अडकले 8 लाखांचे 4 टन मांगूर मासे

अहमदनगर- नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून एक टेम्पो पकडला. यामध्ये बंदी असलेल्या मांगूर मासे मिळून आले. अहमदनगर ते औरंगाबाद रोडने माळीचिंचोरा फाटा येथे ही कारवाई केली असून टेम्पोतून 8 लाख रुपये किंमतीचे 4 टन जिवंत मांगूर मासे जप्त करण्यात आले. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत अहमदनगरच्या सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी प्रतिभा शिवराज दत्तू यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

फिर्यादीत म्हटले की, 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता वाजता अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर माळीचिंचोरा फाटा येथे पांढर्‍या रंगाच्या आयशर टेम्पोतून (एमएढ़ 46 बीयू 7865) बंदी असलेल्या मांगूर माशाची विक्री करण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडने जाणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना सदर गाडी पकडून कारवाई करण्यास सांगितले.

 

त्यानुसार माळीचिंचोराफाटा येथे पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांसह पोलीस पथक थांबले असता आयशर टेम्पो जाताना दिसला. तो थांबवून चालक व त्याच्या शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्यांचे नाव गाव विचारले असता बप्पा ताजरुल बिश्वास (वय 32) व तोकामल मियाराज बिश्वास (वय 48) दोघेही रा. 24 परगाना (पश्चिम बंगाल) असे असल्याचे सांगितले. टेम्पोत जिवंत मांगूर मासे असून ते मध्यप्रदेशात घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

 

त्यांच्याकडून 8 लाख रुपये किमतीचे 4 टन वजनाचे पाण्याच्या टाकीत ठेवलेले मांगूर जातीचे जिवंत मासे तसेच टाटा आयशर टेम्पो (एमएच 46 बीयू 7865) अंदाजे किंमत 25 लाख रुपये असा 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

मांगूर जातीचा माशाचे संवर्धन, वाहतूक आणि विक्रीवर शासनाकडून बंदी असल्याने सदर माशाच्या प्रजाती व बेकायदेशीरपणे वाढवून त्याची खाण्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आल्याने केंद्रीयकृषी मंत्रालय भारत सरकार यांनी 19 डिसेंबर 1997 च्या परिपत्रकामध्ये मांगूर माशापासून भारतीय माशांच्या प्रजातीला व पर्यावरणाला धोका निर्माण झाला असल्याने सदर मत्स्य पालन करून त्याची विक्री व वाहतूक बंदीच्या आदेशाचे जाणीवपूर्वक भंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने वर नमूद वाहनामध्ये मांगूर माशाची वाहतूक करताना मिळून आले म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे फिर्याद नोंदवली. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 119/2023 भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button