लेटेस्ट

‘असनी’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळला ! समुद्रात 6 बोटी बुडाल्या तर 60 मच्छीमार….

असनी’ चक्रीवादळाचा धोका ओडिशा राज्याला बसू लागला आहे. या चक्रीवादळामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळू लागल्या आहेत. दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई केली आहे.

मात्र इशार्‍यानंतरही समुद्रात गेलेले मच्छीमार यांच्या बोटी या चक्रीवादळाच्या तडाख्यात नष्ट झाल्या आहेत. ओडिशातील गंजम जिल्ह्यात 6 बोटींमधून सकाळी 60 मच्छीमार केवळ सुदैवाने समुद्रातून परतू शकले.

समुद्रात यादरम्यान मोठा अपघात झाला. या सर्व 6 बोटी बुडाल्या; पण वेळीच परतीचा अलर्ट मिळाल्याने प्राणहानी टळली. ओडिशात उंच लाटांमध्ये समुद्रात अडकलेल्या सहा बोटी एकामागून एक उलटल्या.

मोठा गोंधळ उडाला. मात्र, वेळीच सर्व मच्छीमारांना सुरक्षितपणे किनार्‍यावर आणले गेले. विशेष म्हणजे, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा तसेच जे समुद्रात आहेत, त्यांना तातडीने परतण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता.

दरम्यान या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ओडिशा तसेच आंध्र प्रदेश सरकार ‘असनी’बाबत हाय अलर्टवर आहेत.

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता इंडिगोने विशाखापट्टणम विमानतळावर येणारी आणि या विमानतळावरून जाणारी तब्बल 23 उड्डाणे रद्द केली आहेत.

चेन्नई विमानतळावरून अशी 11 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशातील अनेक भागांत 11 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे. वार्‍यांचा वेगही ताशी 40 ते 60 किलोमीटर असू शकेल.

बंगालमध्येही वादळाचा कहर सुरू आहे. कोलकात्यात मुसळधार पाऊस झाला. जनजीवन विस्कळीत झाले आहे. महानगरातील अनेक भागांत पाणी साचले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button