शेतकर्याच्या बँक खात्यातून परस्पर काढले सहा लाख 80 हजार; कसे?…

अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी येथील शेतकर्याची परवानगी न घेता त्यांच्या बँक खात्यास आधारकार्ड लिंक करून अज्ञात व्यक्तीने सहा लाख 80 हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधीत शेतकर्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी फिर्यादी यांच्या खात्यास लिंक असलेल्या आधारकार्ड नंबरवरील अनोळखी इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कुंभारवाडी येथील फिर्यादीचे इंडियन ओव्हरसीज बँकेत खाते आहे. त्यांच्या या खात्यावर रक्कम होती. त्यांनी त्यांच्या बँक खात्याचा कोणताही तपशील इतर कोणालाही दिलेला नव्हता. तसेच त्यांनी कुठल्याही ओटीपी संबंधी माहिती दिलेली नव्हती.
असे असतानाही 18 जून ते 20 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात इसमाने विनापरवानगी फिर्यादी यांच्या बँक खात्यास एक आधार नंबर लिंक केला. त्याव्दारे फिर्यादी यांच्या खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर सहा लाख 80 हजार रूपयांची रक्कम काढून घेत त्यांची फसवणुक केली आहे.
आपल्या खात्यातील रक्कम कोणीतरी परस्पर काढून घेतली असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाल्यानंतर त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेतही चौकशी केली. फिर्यादी यांना त्यांची रक्कम न मिळाल्याने त्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.