पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीस ७ वर्ष कारावासाची शिक्षा

नेवासा स्वतःच्या पत्न पीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस येथील सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी ७ वर्ष सश्रम कारावास व १ लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकारपक्षातर्फे अति सरकारी वकील मयुरेश नवले यांनी काम पाहिले. खटल्याची थोडक्यात हकीकत की, आरोपी पती अजय उर्फ बालासाहेब सुगन्ध चक्रनारायण रा. राजवाडा, नेवासा ता.नेवासा जि. अहमदनगर याने दि. २० मे २०१८ रोजी रात्री जेवण झाले नंतर सुमारे ११.३० वाजता पत्नी अनिता हिच्या चरित्राचा संशय घेवून डोक्यात व माने जवळ कुऱ्हाडीने वार केले.
यामुळे अनिता हिचा ओरडण्याचा आवाज ऐकून दोन्ही मुले जागे झाली. तेव्हा मुलगा अनिकेत याने वडीलांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपी अजयने मुलाचे पायावर कुन्हाडीने वार केला. मुलगी अंजली मध्ये आली असता तिला मारहाण केली. पुन्हा पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. त्यामुळे पत्नी जागेवरच बेशुद्ध झाली.
त्यावेळी आरडाओरड झाल्याने शेजारील लोक तेथे जमा झाले. त्यांनी लगेचच जखमींना गाडीत घालून ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे औषधोपचार करीता दाखल केले. नंतर अनिताने आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भा. द. वि. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली.
सदर गुन्हयाचा तपास होवून नेवासा पोलीस स्टेशनने दोषारोपपत्र कोर्टात दाखल केले. सदर खटल्यात चौकशी कामी एकूण सहा साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले. या प्रकरणात फिर्यादी, डॉक्टर व जखमी साक्षीदार यांचे जबाब, पुरावा महत्वाचे ठरले.
सरकारपक्षातर्फे सादर साक्षीपुरावे व युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस दोषी धरून ७ वर्ष सश्रम कारावास व रक्कम रुपये १ लाख ५० हजार इतकी द्रव्यदंडाची तसेच भादवि क ३२४ अन्वये २ वर्षे कारावास व कलम ५०४ अन्वये ३ महीने कारावास व भादवि कलम ५०६ अन्वये २ वर्षे कारावास व रुपये ५ हजार दंडाची शिक्षा सुनावली.
खटल्यात सरकारपक्षातर्फे अति. सरकारी वकील मयुरेश नवले यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पो. कॉ. सुभाष हजारे, पो. कॉ. बाळासाहेब बाचकर म.पो. कॉ. नवगिरे, पो.हे. क. आर. एस. काळे, एस. एम. म्हस्के, पो. का. आर. एस. पवार यांचे सहकार्य लाभले