भुईकोट’च्या विकासासाठी ९५ कोटींचा आराखडा
याबरोबरच किल्ला पर्यटनदृष्ट्या विकासासाठी १५ वर्षांचा करारही प्रस्तावित केला आहे. आराखडा व प्रस्तावित करारास संरक्षण विभागाने तत्वतः मान्यता दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

Ahmednagar News : ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी जिल्हा प्रशासनाने ९५ कोटी रुपये खर्चाचा आराखडा संरक्षण विभागाकडे पाठवला आहे.
याबरोबरच किल्ला पर्यटनदृष्ट्या विकासासाठी १५ वर्षांचा करारही प्रस्तावित केला आहे. आराखडा व प्रस्तावित करारास संरक्षण विभागाने तत्वतः मान्यता दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
संरक्षण विभागाशी संबंधित नगरच्या विविध प्रश्नांसंदर्भात महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून दिल्ली येथे संरक्षण सचिवांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अन्य प्रश्नांबरोबरच नगरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासाची चर्चा करण्यात आली. यावेळी संरक्षण सचिवांनी आराखडा व करारास तत्वतः मान्यता दिली.
आराखडा नंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारच्या पर्यटन विकास मंत्रालयाकडे पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी सन २०१७ मध्ये किल्ल्याच्या विकासासाठी संरक्षण विभाग व राज्य सरकार यांच्यामध्ये ५ वर्षांचा करार करण्यात आला होता. हा करार गेल्यावर्षी संपुष्टात आला.
त्यानंतर त्याच्या नूतनीकरणांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या दूर करून आता ५ वर्षांऐवजी १५ वर्षांचा करार केला जाणार आहे. त्यामुळे किल्ला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल, असे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.
आराखड्यानुसार तीन टप्प्यात होणार पर्यटन विकास कामे
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचा ३ टप्यांत पर्यटन विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्यात किल्ल्याचे प्रवेशद्वार,
बुरुज व स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कैदेत ठेवलेल्या स्वातंत्र्य सेनानींचा कक्ष व परिसर विकसित करणे, दुसऱ्या टप्यात किल्ल्याच्या आतील बाजूचा विकास करणे व तिसऱ्या टप्यात किल्ल्याभोवतीच्या खंदकाचा उपयोग करत त्यामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे, विद्युत रोषणाई करणे, अशा पद्धतीने टप्याटप्याने कामे होणार आहेत.