लाचखोर ग्रामसेवकाला घडवली अद्दल…२५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

नव्याने बांधलेले घर नियमाकुल नोंद करून घरपट्टी निश्चित करण्यासाठी ग्रामसेवकांने घर मालकाकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना नुकतेच रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी ग्रामसेवक नितीन सगाजी मेहेरखांब (वय ४२) यांच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदाराच सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द या ठिकाणी गावठाणात जुने राहते घर आहे.
मध्यंतरी त्यांनी आपल्या घराचा दर्शनी काही भाग आणि ओटा काढून घराचे नूतनीकरण करताना दोन मजली घर बांधले. सदर इमारतीची नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालयात नोंद व्हावी व त्याची घरपट्टी निश्चित करावी, यासाठी त्यांनी पाथरे खुर्द ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या नितीन मेहेरखांब या ग्रामसेवकाशी संपर्क साधला.
या कामासाठी त्याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर सदरची रक्कम दोन हप्त्यामध्ये देण्याचे ठरले.लाचेचा हप्ताही बुधवारी (ता.१२) देण्याचे ठरले. त्यानुसार ठरलेल्या रकमेचा पहिला हप्ता ग्रामसेवक सांगतील त्या ठिकाणी पोहोच करण्याचेही ठरले. मात्र तक्रारदाराने केलेले घराचे बांधकाम नियमानुसार असल्याने त्यांनी सदरील लाचखोर कर्मचाऱ्याला कायमची अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला.
तक्रारदाराने याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच या विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे यांनी पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांना सापळा लावून कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार श्रीमती घारगे यांनी पोलीस हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी व चालक पो. ना. परशुराम जाधव यांच्यासह बुधवारी सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील जवळके (ता. कोपरगाव) येथे सापळा लावला.