डॉक्टरांना खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून डॉक्टरकडे खंडणीची मागणी करत शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याची तसेच दवाखाना बंद करण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. आनंद सदाशिव खाडे (रा. विळद, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी डॉ. खाडे यांचे देहरे गावात हॉस्पिटल आहे.
तेथे गोरख गजाबापू करांडे (रा.देहरे) हा व्यक्ती गेल्या तीन महिन्यांपासून दवाखान्यात येवून डॉक्टरांकडे पैशाची मागणी करत त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत होता. तसेच जीवे मारण्याची आणि दवाखाना बंद करण्याची धमकी देत होता. २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता त्याने दवाखान्यात येवून दीड लाखाची खंडणी मागितली होती.
त्यावेळी डॉक्टरांनी त्याला तीन हजार रुपये फोन पे वर पाठवले. त्यानंतर २४ मार्च रोजी पुन्हा दीड लाख रुपयांची मागणी केली होती. डॉक्टरांनी त्याला फोन- पेवर ५० हजार रुपये पाठवले. काही दिवसांनी ३ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसताना आरोपीने हॉस्पिटलमध्ये जावून सीसीटिव्ही कॅमेऱ्याची वायर तोडली तसेच डीव्हीआर तोडून टाकला.
त्यानंतर १५ मे रोजी रात्री ९ वाजता आरोपी डॉक्टरच्या घरी गेला व त्याने ६ लाख रुपये मागितले. पैसे नसतील तर फोर व्हिलर गाडी दे, नाही दिली तर तुला उचलून घेवून जाईन व तुझा काटा काढीन,
असे म्हणत सुमारे १ तास गोंधळ घातला. २ दिवसांनी १७ मे रोजी पुन्हा फोन करुन पैशाची मागणी करत धमकी दिली. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेल्या डॉक्टरांनी गुरुवारी (दि. १८) पहाटे एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी गोरक्ष करंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे…