अहमदनगर

हरवलेल्या मुलीचा शोध घेताना लागला बाल विवाहाचा छडा; वाचा नेमकं घडलंय काय

अहमदनगर- पत्नी हरवल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पतीसह त्याच्या घरच्यांना पोलिसांनी कायद्याचा धडा शिकवला. कारण हरवलेली पत्नी अल्पवयीन असल्याचे तिच्या कागदपत्रांतून समोर आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरूणावरही पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

हा प्रकार जामखेड तालुक्यात घडला असून दोन्ही गुन्हे जामखेड पोलीस ठाण्यात दाखल झाले

 

याप्रकरणी पीडितेचा पती, मामा-मामी, आई-वडील, सासू- सासरे, दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीला फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी विकास बबन खांडवे, (रा.कर्‍हेवडगाव, ता. आष्टी, जि.बीड) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड नगरपरिषद हद्दीतील धोत्री येथील 27 वर्षीय तरूणाने 18 जानेवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला त्याची पत्नी सकाळी गावातील दवाखान्यात जाते असे सांगून राहते घरातून निघून गेल्याची तक्रार जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केली.

 

त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय लाटे हे चौकशी करत असताना चौकशी दरम्यान हरवलेल्या महिलेच्या जन्मतारखेबाबतची कागदपत्रे तपासणी करताना धक्कादायक माहिती समोर आली. हरवलेल्या विवाहितेचे वय केवळ 15 वर्षे असल्याचे दिसून आले. मुलगी अल्पवयीन असल्याची जाणिव असताना या गुन्ह्यातील संशयितांनी तिचे लग्न जमवून, लग्न लावण्यास परवानगी देऊन तिच्या लग्नात समक्ष उपस्थित राहून लग्न करून दिल्याचे समोर आले आहे.

 

ती सासरी नांदत असताना 18 जानेवारीला तीला फूस लावून विकास बबन खांडवे याने तिचे कायदेशीर रखवालीतून अपहरण केले आहे. त्यानुसार त्यावर अपहरणारचा तर पीडितेच्या पती, सासरचे तसेच आई वडील व मामा विरोधात बाल-विवाह प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हरे करीत आहेत.

 

समाजात होणारे असे प्रकार खुप गंभीर आहेत. तालुक्यात बालविवाहाचे प्रयत्न होत असल्यास तात्काळ जामखेड पोलीस स्टेशनला कळविण्यात यावे. माहिती देणारांची माहिती गुप्त ठेवण्यात येईल. महिलांच्या व बालकांच्या संरक्षणासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

 

– संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक, जामखेड पोलीस स्टेशन

Related Articles

Leave a Reply

Back to top button