अहमदनगर

महावितरणच्या नावे आलेल्या बनावट फोनने केली व्यावसायिकाची फसवणुक

अहमदनगर- महावितरणमधून बोलतो, असे सांगून आलेल्या एका फोनला प्रतिसाद दिल्याने व समोरच्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून माहिती भरल्याने एका व्यावसायिकाची 72 हजार 563 रूपयांची फसवणुक झाली आहे.

 

व्यावसायिक राजेंद्र रामनाथ राऊत (वय 51 रा. सिध्दी विनायक कॉम्प्लेक्स, बुरूडगाव रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. 17 जानेवारी, 2023 रोजी दुपारी फिर्यादी मर्चंट बँक, मार्केटयार्ड येथे असताना त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरचा व्यक्ती,‘मी महावितरणमधुन बोलतो आहे,’ असे सांगुन फिर्यादी यांची पुर्ण माहिती दिली. यामध्ये ग्राहक क्रमांक, बिलाची मागील भरलेली रक्कम व अगोदर भरलेली बिलाची माहिती हे सर्व अगदी तंतोतंत दिली. त्यामुळे फिर्यादी यांना असे वाटले की, तो महावितरणच्याच हेल्पलाईन क्रमांकांवरून बोलत आहे.

 

तसेच फिर्यादी यांना मागील तीन महिन्यापासून वीज बील मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी नमुद मोबाईल क्रमाकांवरून विश्वास ठेवुन सदर व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे मोबाईल मधुन अ‍ॅप डाऊनलोड करून सर्व माहिती भरून सदर व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे सुरूवातीला 10 रूपये ट्रान्सफर केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या अ‍ॅक्सेस बँकेच्या खात्यामधून टप्याटप्याने असे एकुण 72 हजार 563 रूपये काढुन घेण्यात आल्याचे मेसेज त्यांना मोबाईवर आले. सदर व्यक्तीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फसवणुक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button