अहमदनगर

दोन वेगवेगळ्या अपघातात तरूणासह शेतकऱ्याचा मृत्यू

अहमदनगर- देव दर्शनावरून घराकडे दुचाकीवरून परतत असताना भरधाव वेगातील खासगी आराम बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नगर-मनमाड महामार्गावर देहरे गावच्या शिवारात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र विलास लष्करे (रा. देहरे ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

रवींद्र हा नगर एमआयडीसीतील कंपनीत कामाला होता. देहरेपासून जवळच असलेल्या शिंगवे गावात असलेल्या शनि मंदिरात सकाळी तो दुचाकीवरून दर्शनासाठी गेला होता. तेथून माघारी परतत असताना देहरे गावच्या शिवारात नगरहून राहुरीच्या दिशेने भरधाव वेगात चाललेल्या खासगी आराम बसने त्याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

 

दरम्यान शनिवारी सायंकाळी नेवासाफाटा येथे ट्रकने धडक दिल्याने नेवासा तालुक्यातील शिरसगावच्या शेतकर्‍याचा जखमी होवून उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन ट्रकचालकावर अपघातासह मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अर्जुन नारायण गवारे (वय 36 धंदा शेती रा. शिरसगाव ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझे वडील नारायण रेवजी गवारे (वय 57) धंदा-शेती रा. शिरसगाव हे दि. 18 रोजी खासगी कामासाठी नेवासा येथे गेले होते. नगर ते औरंगाबाद जाणारे रोडवरील आंबेडकर चौक नेवासाफाटा येथे रस्ता ओलांडत असताना नगरकडून येणारी ट्रक (एमएच 21 एक्स 9977) हिच्यावरील अज्ञात चालक याने त्याचेकडील ट्रक ही रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून नारायण गवारे यांना जोराची धडक देवून अपघातास कारणीभूत झाला. जखमी नारायण गवारे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रात्री 8 वाजता ते मयत झाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button