अहमदनगर

गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात गॅस टाकीचा स्फोट; माय लेकिचा मृत्यू, अखेर…

अहमदनगर- 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात गॅस टाकीच्या स्फोटात संशयास्पद मरण पावलेल्या ज्योती शशिकांत शेलार व मुलगी नमोश्री शशिकांत शेलार (वय ९) या मायलेकिंच्या मृत्यूप्रकरणी पती शशिकांत शेलार यांच्यासह अन्य बारा जणांच्या विरुद्ध श्रीरामपूर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पती शशिकांत अशोक शेलार, अशोक ठकाजी शेलार, लीलाबाई अशोक शेलार, बाळासाहेब अशोक शेलार, कविता बाळासाहेब शेलार, पवण बाळासाहेब शेलार, (रा.बेलापुर), काजल किशोर खरात, सुखदेव खरात, अनिकेत पाटोळे (रा. कोल्हार) तसेच गागरे बाबा, सांगळे बाबा, देवकर गुरु या आरोपींच्या विरुद्ध भादवी कलम 302,201,34 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक करणेसाठी अधिनियम 2013 चे कलम 3(1),(2) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

6 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान हा गॅसचा स्फोट झाला होता. त्यात दोघी मायलेकीचा बळी गेला होता. घटनेनंतर गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने बनाव करुन तसेच सुनियोजित कट करुन गुप्त धनाच्या लालसेपोटी आपली बहीण व भाचीची हत्या करुन पुरावे नष्ट केले असल्याची फिर्याद मयत महिलेचा भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे रा. पिंपळाचा मळा, ता. राहुरी यांनी श्रीरामपूर न्यायालयात फिर्याद दिली होती.

 

त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , श्रीरामपूर यांचे जाक्र.3379/2022 सी. आर्.पी. सी. दि.19/09/2022 अन्वये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. घटनेनंतर काहींनी पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने तपासाची दिशा भरकटली होती. असा आरोप फिर्यादीने केला होता. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणी खळबळ उडाली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button