शिकारीसाठी बसलेल्या बिबट्याची थेट चालत्या दुचाकीवर झेप, मात्र प्रसंगावधानामुळे…

येथील शेतकरी नवनाथ नरके यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. मात्र पत्नी आणि मुलांना पायाला किरकोळ जखमा झाल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे बातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की,तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथोल शेतकरी नवनाथ नरके हे शिक्रापूर येथे पत्नी व दोन मुलांसोबत कामानिमित्त गेले होते.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास काम उरकून शिक्रापूर कासारी फाटा मार्गे तळेगाव ढमढेरेकडे घरी परतत असताना रस्त्याचा कडेला शिकारीसाठी बसलेल्या बिबट्याने नरके यांच्या चालत्या दुचाकीवर हल्ला केला. रस्त्याचा कडेला हालचालीचा आवाज आल्याने नरके यांचे लक्ष बिबट्यावर गेले.
तो हल्लाच्या तयारीत असलेला पाहिल्यावर नरके यांनी गाडीची स्पीड वाढवले. त्यामुळे सुदैवाने बिबट्याची झडप अपुरी पडली. नवनाथ नरके यांच्या पत्नी उर्मिला नरके यांच्या उजव्या पायाला व मुलगा विराज नरके यांच्या डाव्या पायाला बिबट्याच्या पंज्यानी दुखापत झाली.
याबाबत या भागातील बनधिकारी यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. याच महिन्यात मेंढपाळ संतोष इंगळे यांच्या वाड्यावर दोनदा बिबट्यांनी हल्ला करून तीन शेळया फस्त केल्या.
वारंवार बिबट्याचे दर्शन येथील शेतकरी, ग्रामस्थांना होत आहे. याबाबत वारंवार वनविभागाला कळविले तरी कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.