वरखेडला देवीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

नेवासा तालुक्यातील वरखेड येथे काल मंगळवारी (दि.११) श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
यावेळी भाविकांनी केलेल्या देवीच्या नावाच्या जयघोषाने वरखेड क्षेत्र दुमदुमले होते. विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांमुळे येथील रस्ते गर्दीने फुलून गेल्याने वाहतुक कोंडी झाली होती.
त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन भाविकांनी मोठा त्रास सहन करावा लागला. वरखेड येथील यात्रा उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असून नवसाला पावणारी श्री महालक्ष्मीदेवी म्हणून लाखो भाविक यात्रेसाठी येतात.
आपले नवस फेडतात. शुक्रवारी यात्रेनिमित्त मानाच्या पालखीसह विविध पालख्यांचे फटाक्यांच्या आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.
सोमवारी रात्री बरेच भाविक याठिकाणी मुक्कामी होते. काल मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पोलीस, पोलीस मित्र, होमगार्ड या यंत्रणेने सेवा देत स्वयंसेवकांची भूमिका बजावली. वरखेड देवी मंदिर प्रांगण भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
विविध प्रकारच्या अनेक दुकाने शामियाना उभारून थाटली होती. त्यामुळे येथील मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेले होते. भाविकांनी नवस फेडण्यासाठी बोकड व कोंबडीचा नैवैद्य देवी चरणी अर्पण केला.
तर कोणी नवसाची घंटी, कोणी पुरणावरनाचा शाकाहारी नैवैद्य अर्पण करून खणानारळाने ओटी भरून आपल्या नवसाची पूर्तता केली. वरखेड यात्रेच्या संदर्भात प्रशासनासह विविध संघटनांच्या नियोजन बैठका झाल्या.
मात्र नियोजन कोलमडल्याने त्याचा त्रास भाविकांना सोसावा लागला. मंदिर प्रांगणात छोटी मोठी वाहने घुसल्याने यात्रेकरूंना चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. वरखेड गावातील अरुंद रस्ते ही वाहतूक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरली.
यात्रेत इतर ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली. मात्र ते पिण्यास योग्य नसल्याचे पिण्याच्या पाण्यासाठी यात्रेकरूंना विकत पाणी घ्यावे लागल्याचे भाविकांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधीची तरतूद झाल्यास येणाऱ्या अडचणी व इतर जागेचा ही प्रश्न सुटू शकतो, अशी भावना भाविक व्यक्त करीत होते.