अल्पवयीन मुलीचा विवाह लावला, आई- वडील, सासू सासऱ्यांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल

अकोले तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २३ वर्षीय तरुणासोबत विवाह लावून देण्यात आला. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह पती आणि सासू-सासरे, नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोले पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विकास चौरे ब राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंधक दाखल अधिकारी विद्या तुकाराम गाडेकर यांच्या फिर्यादीवरून पतीसह मुलीचे आई-वडील,
सासु सासऱ्यासह नातेवाईकांवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे सदर गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानअंतर्गत जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा आणि सामाजिक संस्था एकत्रित आल्या आहेत. या अभियानाच्या माध्यमातून बालविवाह थांबवण्याचे आणि झालेल्या बालविवाह प्रकरणामध्ये पाठपुरावा करून त्या पीडित बालकाला काळजी आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या अनुषंगाने या प्रकरणामध्ये सुद्धा जिल्ह्यातील सर्व यंत्रणाचा संयुक्तरीत्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल करून त्या मुलीला बालकल्याण समितीच्या आदेशाने काळजी आणि सुरक्षा अंतर्गत शासकीय बालगृह येथे निवारा मिळवून दिला.
यामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बळवंत वारुडकर, बालकल्याण समितीच्या सदस्य अँड. अनुराधा येवले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुलकर्णी, स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे संचालक हनिफ शेख,
समन्वयक प्रवीण कदम, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी, समुपदेशक अलीम पठाण, राहुल कांबळे या सर्वांनी वारंवार पाठपुरावा केल्याने या प्रकरणात सदर अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात यश आले आहे.