‘या’ आदर्श गावातील तरूण शेतकर्यावर धारदार हत्याराने खूनी हल्ला

अहमदनगर- शेतीच्या वादाच्या कारणातून तरूण शेतकरी सागर अंकुश पादीर (वय 31 रा. हिवरेबाजार ता. नगर) यांच्या वर तलवार, कमरेचा बेल्ट व धारदार हत्याराने वार करून खूनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रूग्णलयात उपचार सुरू आहेत.
दत्तवाडी, टाकळी खातगाव (ता. नगर) शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी जखमी सागर पादीर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जालिंदर गोपिनाथ ठाणगे, गोपिनाथ नामदेव ठाणगे, गणेश गोपिनाथ ठाणगे (सर्व रा. हिवरेबाजार) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द खूनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
रात्री 10 वाजता सागर पादीर दत्तवाडी, टाकळी खातगाव शिवारात दुचाकी घेऊन थांबलेले असताना जालिंदर, गोपिनाथ, गणेश व एक अनोळखी असे चौघे त्यांच्याकडील कारमधून तेथे आले. हिवरेबाजार येथील शेतीच्या वादाच्या कारणावरून जालिंदरने त्याच्या हातातील तलवार सागर यांच्या खांद्यावर मारण्यासाठी उगारली असता त्यांनी तो वार हुकवला.
गणेश व अनोळखी व्यक्तीने कमरेचा बेल्ट काढून मारहाण केली. गणेश व जालिंदर यांनी धारदार हत्याराने सागर यांच्या पाठीवर जोरात वार केले. सागर खाली कोसळताच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.