पोलीस मित्राने घरात घुसून महिलेचा केला विनयभंग; या ठिकाणी घडली घटना

राहुरी येथील एका पोलीस मित्राने एका महिलेच्या घरात घुसून तिच्याकडून पैसे मागताना तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आलम शेख नावाच्या या पोलीस मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी शहर परिसरात एक 35 वर्षीय महिला तिच्या दोन लहान मुलांसह राहते. दि. 14 एप्रिल रोजी आरोपी आलम रफिक शेख हा जबरदस्तीने त्या महिलेच्या घरात घुसला. त्या महिलेला म्हणाला, मागील महिन्यात माझे वडील रफिक शेख यांच्याकडून घरखर्चासाठी घेतलेले 10 हजार रुपये परत देऊन टाक. त्यावेळी त्या महिलेने नकार दिला.
त्याचा राग आल्याने आरोपीने महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी पीडितेने आरडाओरडा केला असता तिच्या शेजारील एक महिला धावत आली. त्यावेळी आलम शेख तेथून पसार झाला.
पीडितेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी आलम रफिक शेख रा. राहुरी खुर्द ता. राहुरी याच्या विरोधात विनयभंग व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी आलम शेख याला ताबडतोब अटक करून गजाआड करण्यात आले.