Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरगावातील वाद मिटवण्यासाठी आयोजित ग्रामसभेतच हाणामारी

गावातील वाद मिटवण्यासाठी आयोजित ग्रामसभेतच हाणामारी

Ahmednagar News : गावातील एका व्यक्तीने गावासह केंद्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विरोधात केलेल्या तक्रारींमुळे गेल्या काही दिवसांपासून गावातील वातावरण गढूळ झाले होते.

ते बदलण्यासाठी व या प्रश्नावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत तोडगा तर निघाला नाहीच, उलट हाणामाऱ्या झाल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे घडली.

याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी, गुंडेगाव सह केंद्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या विरोधात गावातील भाऊसाहेब शिंदे या व्यक्तीने शिक्षण विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदे याने शिक्षकांच्या केंद्रस्तरीय बैठकीत घुसून गोंधळ घातला होता.

त्यावेळी त्याच्यावर शिक्षकांच्या फिर्यादी वरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे. शिंदे याच्या कडून सोशल मिडीयावर शिक्षकांबाबत सातत्याने पोस्ट टाकल्या जात असल्याने तेव्हापासून गावात सतत धुसफूस चालू आहे.

शिक्षकांवर कारवाईसाठी शिंदे यानेउपोषणही केले होते. गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांनी या ठिकाणी भेट देत कारवाईचे आश्वासन शिंदे यास दिले.

तर गावातील अनेक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांची बाजू घेत गावातील शैक्षणिक वातावरण बिघडू नये म्हणून गटशिक्षणाधिकारी जाधव यांची भेट घेवून निवेदनही दिले होते.

या सर्व प्रकाराबाबत सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. या वादावर तोडगा काढण्यासाठी गावात बुधवारी ग्रामसभा बोलावण्यात आली.

या ग्रामसभेतही या विषयावरून चांगलेच वादंग झाले व त्याचे पर्यावसन शेवटी एकमेकांना शिवीगाळ करत हाणामारीत झाले. त्यामुळे ग्रामसभा उधळली गेली. हा वाद येथेच न मिटता नगर तालुका पोलीस ठाण्यात गेला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments