ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला कार्यालयात घुसून मारहाण

अहमदनगर- राहुरी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बाबासाहेब हौसिराम आंधळे (वय 42 रा. मुंजोबानगर कॉलेज रोड, राहुरी) यांच्यासह सहकार्याला त्यांच्याच कार्यालयात घुसून सात जणांच्या टोळीने लोखंडी पाईपने मारहाण केली. विळद (ता. नगर) शिवारात नगर-मनमाड रोड लगत असलेल्या श्री.बालाजी ट्रान्सपोर्ट कार्यालयात ही घटना घडली.
आंधळे यांनी शनिवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून सुलतान इराणी (रा. जामखेड), अनोळखी पाच इसम व एक अनोळखी महिला यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाबासाहेब आंधळे व त्यांचे सहकारी त्यांच्या विळद शिवारातील श्री.बालाजी ट्रान्सपोर्ट कार्यालयात होते. बाबासाहेब यांच्या ओळखीचा सुलतान इराणी याने गैर कायद्याची मंडळी जमवुन कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयाची तोडफोड करून डेबलच्या ड्रायव्हरमधील 32 हजार रूपयांची रोख रक्कम, बाबासाहेब यांच्या गळ्यातील चार तोळ्याची चैन तोडून लोखंडी पाईपने मारहाण केली.
मारहाणीत जखमी झालेले बाबासाहेब यांनी रूग्णालयात दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.