विक्रीसाठी गावठी कट्टा घेऊन आला अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकला

अहमदनगर- नगर शहरात मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे विक्रीसाठी येत आहेत. अशाच एका गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली. देविदास भिवाजी ढगे (वय 36 रा. ढगे मळा, केतकी, निंबोडी, ता. नगर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
त्याच्याकडून 30 हजार रूपये किमतीचा गावठी कट्टा, 60 हजार रूपये किमतीची दुचाकी असा 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून ढगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी दीड वाजता कल्याण रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.
एक व्यक्ती कल्याण रोडवरील जाधव पेट्रोलपंपाच्यासमोर शनिराज मार्बल्स येथे गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे (डिबी) प्रमुख पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, संदीप धामणे, दत्तात्रय कोतकर, गौतम सातपुते यांना सापळा लावून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक सोळुंके यांच्या पथकाने दोन पंचासमक्ष शनिराज मार्बल्सच्या परिसरात सापळा लावला.
एक संशयीत तरूण दुचाकीवरून त्या ठिकाणी येताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव देविदास भिवाजी ढगे असे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता पिशवीमध्ये गावठी कट्टा मिळून आला. पोलिसांनी ढगे याला ताब्यात घेत अटक केली तर गावठी कट्टा, दुचाकी हस्तगत केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.