अहमदनगर

मध्यप्रदेशातून गावठी कट्टे घेऊन विक्रीसाठी नगरमध्ये आला अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकला

अहमदनगर- मध्यप्रदेश राज्यात गावठी कट्टे बनविण्याचे केंद्र असलेल्या उमरतीमधून एक युवक चार गावठी कट्टे व 16 जिवंत काडतुसे घेवून नगर शहरात विक्री करण्यासाठी आला होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. रितेंद्र सिंह बरनाला (वय 22 रा. उमरती, जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाली की, एक व्यक्ती गावठी कट्टे व जीवंत काडतसे विक्री करण्यासाठी नगर शहरातील तारकपूर बसस्थानक परिसरात येणार आहे. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे पथकाला कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

 

पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, देवेंद्र शेलार, विशाल दळवी, शंकर चौधरी, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांच्या पथकाने सापळा लावून प्रवासी म्हणून बसची वाट पाहत आहेत, असा बनाव केला. एक संशयित व्यक्ती पाठीवर काळ्या रंगाची सॅक घेऊन येताना आढळून आला.

 

पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने रितेंद्र सिंह बरनाला (वय 22 रा. उमरती, जिल्हा बडवानी, मध्यप्रदेश) असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे अंगझडतीमध्ये चार गावठी कट्टे व 16 जीवंत काडतुसे असा एकूण एक लाख 31 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक करत तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button