अहमदनगर मध्ये २५ कोटींचे सुसज्ज ग्रंथालय उभारणार !
नगर शहरातील स्व. पंडित गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात गेल्या दोन दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा रविवारी (दि.८) मोठ्या उत्साहात समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.

Ahmednagar News : रसिक व वाचकांसाठी नगर शहरातील सावेडी उपनगरात २५ कोटी रुपये खर्चाचे सुसज्ज असे ग्रंथालय उभारले जाणार असल्याची घोषणा खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.
नगर शहरातील स्व. पंडित गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात गेल्या दोन दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा रविवारी (दि.८) मोठ्या उत्साहात समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुणकाका जगताप, शिवाजीराव कर्डिले, भीमराव धोंडे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, डॉ. एस. एस. दीपक, उपमहापौर गणेश भोसले,
मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भागवान राऊत आदी उपस्थित होते खा. विखे म्हणाले, नगर जिल्ह्याच्या उत्तरेत साहित्य चळवळ गेली अनेक वर्षे कार्यरत आहे.
दक्षिणेत मात्र, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी या चळवळीला पाठबळ दिले आहे. येणाऱ्या काळातही जगताप ही चळवळ पुढे घेऊन जातील, अशी अपेक्षा आहे.
जगताप यांनी अचानक साहित्याकडे वळणे हा महायुतीचाच परिणाम असल्याची टिपण्णी करत अरुणकाका तुम्हीही भाजपामध्ये या, अशी थेट ऑफर यावेळी खा. विखे यांनी दिली. आ. जगताप म्हणाले शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राज्यभरातून आलेले साहित्यिक जोडले गेले असून ते कायम सहवासात राहतील. बी. जी. शेखर पाटील म्हणाले,
नगर जिल्ह्याला साहित्य आणि संस्कृतीचा मोठा वारसा आहे. येथील साहित्य चळवळीत कार्यरत असलेले मान्यवर हा वारसा पुढे नेत आहेत.
प्रत्येकामध्ये साहित्यिक असतो. ते समोर येणे गरजेचे आहे. डॉ. निमसे म्हणाले, साहित्यातून समाजाला प्रेरत ठरतील असे विचार व्यक्त होतात.
शब्दगंधची ही चळवळ नवोदितांसाठी व्यासपिठ निर्माण करुन देणारी ठरली आहे. प्रास्ताविक शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले.
साहित्यिकांचा पुरस्काराने गौरव
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने संमेलनात विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्यासह जिल्हाभरातील लेखकांच्या पुस्तकांता शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्यासह राज्यभरातून आलेले साहित्यिक, रसिक उपस्थित होते.
साहित्यिकांनी सकारात्मक विचारांची पेरणी करावी
सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यासाठी समाजाला सकारात्मक विचारांची गरज आहे. म्हणून साहित्यिकांनी समाजात चांगल्या आणि सकारात्मक विचारांची पेरणी करावी.
माता-पित्यांनी मुलांवर संस्कार रुजवावेत. प्रशासनातील माणसांचा जनसंपर्क आणि अनुभव मोठा असतो. त्यामुळे त्यांनीही लिहिते व्हावे, आमदार संग्राम जगताप यांनी साहित्य चळवळीला पाठबळ दिले,
ही चांगली बाब असून या चळवळीची अशीच व्यापकता वाढावी, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी समारोपाच्या भाषणात व्यक्त केली.