महिलेची ऑनलाइन अशी केली सात लाखांची फसवणूक

अहमदनगर- ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी सायबर चोरटे अधिक सक्रिय झाले आहेत. ते काही क्षणात आपल्या खात्यातून पैसे काढून घेतात. अशीच फसवणूक करत नगर शहरातील एका महिलेच्या खात्यातून ऑनलाइन सात लाख रूपये काढून घेतले.
डेबीट कार्ड बंद पडणार असल्याची बतावणी करून मोबाईलवर लिंक पाठवून त्याव्दारे महिलेच्या खात्यातून सात लाख रूपये काढून घेत ऑनलाइन फसवणुक केली. ही घटना रविवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. यासंदर्भात फसवणुक झालेल्या नगर शहरातील महिलेने सोमवारी दुपारी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दिलेल्या फिर्यादीवरून एका मोबाईल नंबर धारक अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंविसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेला रविवारी सकाळी 10.40 वाजता एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. आयसीआयसी बँकेचे डेबीट कार्ड बंद पडणार असल्याचा तो बनावट मेसेज होता.
फिर्यादीचा विश्वास बसल्याने त्यांनी मेसेजमधील लिंक ओपन केली. यानंतर काही वेळातच फिर्यादी महिलेेच्या खात्यावर असलेले सात लाख रूपये काढून घेण्यात आले. आपली फसवणुक झाल्याचे महिलेच्या लक्ष्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत.