कंपनीतील लेबर कॉन्ट्रक्ट काढून घेण्यासाठी तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण

अहमदनगर- कंपनीत घेतलेले लेबर कॉन्ट्रक्ट काढुन घेण्यासाठी तिघांनी लेबर कॉन्ट्रक्टर आर्यन आदिनाथ गिरमे (वय 27 रा. ताठेमळा, भुतकरवाडी, सावेडी) यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. नागापूर एमआयडीसीतील जी.के.एन. कंपनीत ही घटना घडली आहे.
जखमी गिरमे यांनी रविवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश नरेश शेळके, ऋषिकेश कदम, विशाल काटे (सर्व रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.
आर्यन गिरमे यांनी नागापूर एमआयडीसीतील जी.के.एन कंपनीत लेबर कॉन्ट्रक्ट घेतले आहे. रविवारी दुपारी आर्यन कंपनीच्या गेटवर असताना तेथे यश, ऋषिकेश व विशाल हे तिघे आले. त्यांनी,‘लेबर कॉन्ट्रक्ट काढुन घे, नाहीतर तुला महागात पडेल,’ असे म्हणुन आर्यन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली.
यश नरेश शेळके याने लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणीची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आर्यन गिरमे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक फौजदार लोखंडे करीत आहेत.