सह शहर अभियंता बैठकीला गैरहजर; आयुक्तांनी बजावली नोटीस

पर्यावरण विभागाशी संबधित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे नियोजित एका बैठकीला सहशहर अभियंता संजय कुलकणी गैरहजर राहिले. याची गंभीर दखल घेत आयुक्त शेखर सिंह यांनी संजय कुलकर्णी यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तसेच, ४८ तासात लेखी खुलासा मागितला आहे. या प्रकरणात आयुक्तांनी कुलकर्णी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून पालिकेतील सर्वच अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
नागरिकांच्या तक्रारी, कार्यालयीन शिस्तीच्या सूचना आणि प्रशासनाच्या आदेशाकडे डोळेझाक करण्यावरून आयुक्त सिंह यांनी वारंवार आदेश काढले आहेत. परंतु, त्याकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करतात. ही बाब आयुक्तांनी गांभीर्याने घेतल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. पर्यावरण विभागाअंतर्गत येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी व इतर प्रकल्पांच्या नियोजनाबाबत बुधवारी (दि.१२) सकाळी दहा वाजता आभासी बैठक नियोजित होती.
या बैठकीपूर्वी आयुक्त स्वतः पावणेदहाच्या सुमारास पालिकेत पोहोचले. परंतु, बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या असताना सहशहर अभियंता कुलकर्णी बैठकीला हजर नव्ह्ते. याची गंभीर दखल घेत आयुक्त सिंह यांनी संजय कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सूचना देऊनही बेठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला. यापूर्वीही २९ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वच्छ सर्वेक्षणविषयक कार्यशाळेला अनुपस्थित राहिला होतात. त्यावेळी देखील नोटीस बजावण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी अशोभनीय अशी कृती करणे अभिप्रेत नाही.
तरीही तुमची ही कृती जाणीवपूर्वक केले असल्याच्या निष्कार्षाप्रत मी आलो आहे. या प्रकरणी तरतुदीनुसार कारवाई का करू नये ? याचा लेखी खुलासा ४८ तासात माझ्याकडे सादर करावा, असे बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे.