अहमदनगर

मोबाईल खेळायला देण्याचा आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; न्यायालयाने…

अहमदनगर- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरूणाला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा अतिरिक्त व विशेष (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली. रशीद सरदार बेग (वय 28 रा. खोसपुरी ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपी तरूणाचे नाव आहे. सदर खटल्यात अ‍ॅड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले.

 

इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी आठ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 24 सप्टेंबर 2020 रोजी तिच्या घरासमोरील ओट्यावर खेळत होती. त्यावेळी रशीद बेग याने मोबाईल खेळायला देतो, असे म्हणून तिच्या हाताला धरून घरी घेऊन आला. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेली सर्व घटना तिच्या आईला सांगितली.

 

पीडित मुलीचे आईने एमआयडीसी पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी घटनेची खात्री केली. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रशीद बेग याच्याविरूध्द अत्याचार आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधोर यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

 

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी, पीडितेची आई, वैद्यकिय अधिकारी, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वयासंदर्भात मुख्याध्यापक यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. या आधारे रशीद बेग याला दोषी धरून 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दोन रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार भगवान वंजारे आणि आडसूळ यांनी सहकार्य केले.

 

अ‍ॅड. मनिषा केळगंद्रे यांनी आरोपी रशीद बेग याला कठोर शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीच्या मनावर गंभीर परिणाम झालेला आहे. तिचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. समाजात वाढणारी विकृती पाहता या प्रकरणामध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद केला.

 

न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरून रशीद बेग याला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि दोन रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button