दोन गटाच्या वादात महिलांशी गैरवर्तन; चौघांविरूध्द गुन्हा

दोन गटात वाद झाल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आदी कलमान्वये चौघांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
सर्जेपुराच्या रामवाडी भागात ही घटना घडली. प्रकरणी दोन्ही गटाच्या महिलांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. पहिल्या गटाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघा भावांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाथरूम करीता जात असताना एकाने त्यांना पाहून शिट्टी वाजवली व हात धरून जवळ ओढत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादी तेथून घरी गेल्या.
रात्री 11 वाजता त्यांनी पतीला झालेला प्रकार सांगितला. फिर्यादी यांचे पती जाब विचारण्यासाठी गेले असता दोघा भावांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसर्या गटाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लालटाकी येथील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व त्यांचे पती जेवन करून फिरण्यासाठी बाहेर पडले असता त्यांना आरोपींनी मारहाण केली. शनिवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली.
आरोपींनी सुरूवातीला फिर्यादीच्या पतीला धक्का देऊन खाली पाडले, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपी फिर्यादीजवळ आला व म्हणाला,‘तु खुप सुंदर दिसते, तु मला आवडतेस’, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.