अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला न्यायालयाने ठोठावली…

अहमदनगर- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 20 हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी ठोठावली. छबू उर्फ छबन पांडुरंग आखाडे (वय 58 रा. चिंचोली काळदात, ता. कर्जत) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अॅड. संगिता ढगे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
छबू उर्फ छबन आखाडे याने चिंचोली काळदात परिसरातील एका गावातील घरी एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीला धमकावून 10 जानेवारी रोजी 12 वाजता आणि 26 जानेवारीला सकाळी साडे अकरा वाजता अत्याचार केला. पीडितेने ही माहिती आईला सांगितली.
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी छबू उर्फ छबन पांडुरंग आखाडे (वय 58) याच्याविरूध्द अत्याचाराबद्दल भा.दं.वि कलम 376, धमकावल्याबद्दल 506 अन्वये तसेच बाललौंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी छबू याचा मुलगा सुंदर उर्फ सुंदरदास आखाडे याने ही मुलीच्या आईला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले होते. त्यानुसार त्याच्याविरूध्द ही धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात पीडित मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. छबू आखाडे याच्याविरूध्द गुन्हा सिध्द झाला. सुंदरदास आखाडे याची सबळ पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्तता केली. सरकारी वकील संगिता ढगे यांनी कठोर शिक्षा देण्याचा युक्तीवाद केला.
न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरून मरेपर्यंत जन्मठेप आणि 20 हजार रूपये दंड ठोठावला. महिला पोलीस आशा खामकर आणि गणेश काळाणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.