अहमदनगर

वारकर्‍यांच्या पिकअपचा अपघात; एक ठार, १२ जखमी

अहमदनगर – पाथर्डी येथील वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन पिकअपमध्ये माघारी येत असताना पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात एका वारकर्‍याचा मृत्यू झाला तर १० ते १२ वारकरी जखमी झाले आहेत. जखमी मधील तीन वारकरी गंभीर जखमी आहेत. आष्टी तालुक्यातील हाकेवाडी फाटा परिसरात रविवारी रात्री हा अपघात झाला आहे. रावण सखाराम गाढे (55 रा. धनगरवाडी, ता. पाथर्डी) असे या अपघातात मृत्यु झालेल्या वारकर्‍याचे नाव आहे.

 

तर बंडू बाजीराव गाढे, हरी बबन चितळे, अशोक रावसाहेब चितळे, शोभा महादेव चितळे, गोरक्ष दादाबा गाढे, कोंडाबाई पंढरीनाथ गाढे, तुळशीराम नामदेव गाढे, सुधाकर भाऊ गाढे (सर्व रा. धनगरवाडी ता. पाथर्डी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील धनगरवाडी येथील वारकरी हे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन पिकअप वाहनाने परत येत होते. रविवारी रात्री बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हाकेवाडी फाट्यावर वारकर्‍यांची पिकअप गाडी खडीच्या ढिगारावरून जाऊन पलटी झाली. या अपघातात रावण गाढे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

 

 

  1. अपघाताची माहिती मिळताच धनगरवाडीचे अशोक गाढे, मिठू चितळे, मच्छिंद्र चितळे, आजिनाथ गाढे, प्रकाश चितळे, भाऊ पवार, नारायण पवार आदींनी अपघातग्रस्तांसाठी मदत केली. माणिकदौंडीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ यांनी या घटनेची माहिती आमदार मोनिका राजळे यांना देऊन राजळे यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना सहकार्य केले. अपघातात मृत पावलेले रावण गाढे यांच्या वारसाला व अपघातात जखमी असलेले वारकरी यांच्या रुग्णालयाच्या खर्चासाठी राज्य सरकार कडून मदत होण्यासाठी आपण आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ओव्हळ म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button