अहमदनगर

गर्भपात गोळ्या साठा प्रकरणातील आरोपी बोठे पसार, पोलीस त्याच्या मागावर

गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सापडल्याप्रकरणी सावेडीतील मेडिकल एजन्सीचालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. पंकज कॉलनी, टीव्ही सेंटर, सावेडी) याच्यासह हरियाणातील औषध कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान वैद्यकीय परवानगीशिवाय वापरण्यास बंदी असलेल्या या गोळ्यांचा मोठा साठा आढळून आल्याने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून, मोठ्या रॅकेटचा यातून पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, एमआयडीसीतील व्हीआरएल लॉजिस्टीक्स या ट्रान्सपोर्ट कंपनीत शनिवारी सकाळी औषध प्रशासन व पोलिसांनी कारवाई करत गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त केला.

प्रत्येकी पाच गोळ्यांचे एक कीट याप्रमाणे नऊशे कीट जप्त करण्यात आले होते. थंडीतापाच्या गोळ्यांच्या वेष्टनात या गोळ्या आलेल्या आहेत. या साठ्याची किंमत साडेसात लाख रुपयांच्या आसपास आहे.

दरम्यान, औषध प्रशासनाने गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या फॉरेन्सीक लॅबकडे पाठविले व ज्याच्या नावे हा साठा आलेला होता, त्या सावेडीतील श्रीराम मेडिकल एजन्सीचालक नितीन बोठे याला म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

दरम्यान बोठे हा तपासात दिशाभूल करत असल्याचा संशय आहे. विशेष बाब म्हणजे बोठेच्या एजन्सीचा पत्ताही बोगस निघाला असून, टीव्ही सेंटर येथील घरातूनच तो हा कारभार करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे.

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी बोठे हा पसार झाला असून, एमआयडीसी पोलीस त्याच्या मागावर आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button