शिर्डीत चेन स्नॅचिंग करणारा आरोपी ताब्यात : दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

शहरात काही दिवसांपूर्वी केलेल्या धूमस्टाईल प्रकारचे तीन गुन्हे दाखल असलेल्या साहील ऊर्फ मिडा बाबासाहेब पिंपळे (वय २५, राहणार अशोकनगर, ता. श्रीरामपूर ) हा आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज पोलिसांच्या कोठडीमध्ये होता.
शिर्डी येथील केलेल्यागुन्ह्यांमध्ये वर्ग करून नुकतीच त्यास अटक करण्यात आली. आरोपीने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे दीड लाखाचे २५ ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.
त्यांच्यावर शिर्डी पोलिस स्टेशनमध्ये तीन गुन्हे या अगोदर दाखल आहेत. याबाबत दुधाळ यांनी पत्रकारांना सांगितले, को जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शिर्डी येथील दुचाकी व धूमस्टाईल गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.
त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत आरोपीकडून दीड लाखाचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीच्या सहवासात असलेले व त्यास मदत करणाऱ्यांचा देखील शिर्डी पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
या कारवाईत हेड कॉन्स्टेबल संदिप गडाख, नितीन शेलार, अजय अंधारे, राजेंद्र बिरदवडे यांनी भाग घेतला. दरम्यान शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकेवर काढू लागली आहे.
वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने देखील कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच चैन स्नॅचिंग करणारा आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.