गंभीर गुन्हयातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

नगर शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूमस्टाईलने चोरणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान आरोपींकडून एक लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कंबर रहीम मिर्झा (वय 35, रा. वार्ड नंबर 1, श्रीरामपूर) आणि अनिल रावसाहेब चव्हाण (वय 25, रा. दत्तनगर, स्टेशन रोड, ता. राहुरी रोड) यांचा समावेश आहे.
या आरोपींना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी प्राजक्ता सुरेंद्र गाडे यांचे दोन तोळ्याचे मंगळसुत्र आरोपींनी धुमस्टाईलने चोरून नेले होते. यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे चैन स्नॅचिंगचे पथक आरोपींचा शोध घेत असताना हा गुन्हा कंबर मिर्झा याने केला असून तो श्रीरामपूर येथे दागिने मोडण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा लाऊन आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेतले. आरोपींकडे असलेली दुचाकी त्यांनी चंदननगर (जि. पुणे) येथून चोरलेली आहे. दुचाकी चोरीसंदर्भात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपींकडून सोन्यांचे दागिने आणि दुचाकी असा एक लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी कंबर मिर्झा याच्याविरोधात केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यात सात तर महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सोलापूर, धुळे व अहमदनगर जिल्ह्यात 24 असे 31 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी अनिल चव्हाण याच्याविरोधात दरोड्याची तयारी आणि फसवणुकीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.