वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा…नदीपात्रातून वाळू चोरी करणारे वाहने पकडले

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरी करणारा डंपर व पोकलेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून पकडला आहे. पोलिसांच्या या आक्रमक कारवाईमुळे वाळू तस्करणाचे धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक़ अनिल कटके यांना गुप्त खबर मिळाली कि, नायगाव येथून नदीपात्रातून पोकलेन व डंपरमधून बेकायदेशिर वाळू चोरून नेली जात आहे. त्यांनी स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.
त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे 1 पोकलेन व टाटा कंपनीचा हायवा डंपर वाळू चोरताना मिळून आला. या कारवाईत पोलिसांनी एक पोकलेन तसेच हायवा डंपर ताब्यात घेतला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर संपत चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हायवा चालक अमोल बाबासाहेब कराळे (वय 31, रा. रोठीवस्ती, ता. वैजापूर) व पोकलेंट चालक अनुपकुमार मिश्रीप्रसाद (वय 24, रा. महाई बलिया चितबडागाव, उत्तरप्रदेश) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.