शिर्डीतील त्या तीन लॉज मालकांवर पिटाअंतर्गत कारवाई

Ahmednagar news : पीडित महिलांचा वापर पैसे कमावण्यासाठी करणाऱ्या शिर्डी शहरातील तीन लॉज मालकांवर पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले,
की शिर्डी शहरातील काही हॉटेलचा वापर समाजविघातक कामासाठी करून पीडित महिलांच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी होत असल्याचे पोलीस कारवाईत पुढे आले होते. महिलांचे शोषण करणारा व्यक्ती कितीही मोठा असला, तरी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल,
असे संकेत शिर्डी शहरात ५ मे २०२३ रोजी करण्यात आलेल्या ६ हॉटेल कारवाईच्या वेळी पोलीस प्रशासनाने दिले होते. या कारवाईत पोलिसांनी नऊ आरोपींना अतिशय नियोजनबद्ध मोठा पोलिस फौजफाटा घेऊन अटक केली होती.
त्या अनुषंगाने ११ मे रोजी उशिरा शिर्डी पोलिसांनी तीन हॉटेल मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे दि. ६ मे रोजी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला,
अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसी कारवाई करून काही पीडित महिलांसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात ११ आरोपींचा समावेश होता.
यात आता आणखी तीन आरोपींची भर पडली आहे. हे तिघेही हॉटेल मालक आहेत. यातील साई महाराजा लॉजिंगचे मालक राजेंद्र मनसुखलाल लोढा (वय ६०, रा. प्रसादनगर, शिर्डी), साई गणेश लॉजिगचे मालक सुनिल पृथ्वीराज लोढा (वय ५८, रा. एरिगेशन बगल्याशेजारी, शिर्डी), हॉटेल एस.पी. लॉजिंगचे मालक एजाज आयानखान पठाण (वय ४४, रा. साकुरी शिव, शिर्डी) यांच्या विरोधात पिटा व पोक्सो कायदद्यासह इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ मे रोजी या तीन आरोपींना राहाता न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.
त्यांनी सांगितले की उर्वरित लॉजिंग मालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक प्रयत्न करत असुन त्यांनादेखील ताब्यात घेतले जाणार आहे. लॉजिंग मॅनेजर व रूम बाँय यांच्यावर अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित लॉजिंग मालकांना पोलिसांनी अटक केल्यामुळे शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शिर्डी शहरातील या गुन्ह्याच्या संबंधातील काही आरोपी परागंदा झाल्याने त्याचा पोलीस पथक शोध घेत होते. यात अत्यंत बारकाईने तपास सुरू असुन आरोपींच्या सहवासात कोण होते, त्यांना पाठबळ कोणाचे होते, त्याबरोबरच अशा पद्धतीने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक कोठे व कशी करण्यात आली आहे, याचीदेखील चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले