अहमदनगर

दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ; न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

व्हे-पावडरमध्ये मेलामाईन या घातक पदार्थाची भेसळ करणार्‍या आरोपीला सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी रूपेश राजगोपाल झंवर असे आरोपीचे नाव आहे.

त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यामुळे झंवर याच्या अडचणीत वाढ झाली असून एमआयडीसी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाचे सहआयुक्त त्यांच्या पथकाने जुलै 2021 मध्ये झंवर याच्या एमआयडीसी येथील गणेश एजन्सीवर छापा टाकला होता.

तिथे झंवर याने रिपॅक व विक्री करीत असलेल्या व्हे-पावडरचे (मिल्की ओसियन बॅण्ड) नमुने अन्न सुरक्षा अधिकारी रा. ना. बढे यांनी तपासणीसाठी घेत उर्वरित साठा जप्त केला होता.

या नमुन्यामध्ये मेलामाईन या घातक पदार्थाची भेसळ म्हैसूर येथील केंद्रीय रेफरल अन्न प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत आढळली. झंवर याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या दाखल गुन्ह्यात झंवर याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने झंवर याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली असून त्याच्या मागावर एमआयडीसी पोलीस आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button