अहमदनगर

अघोरी उपाय; महिलेला उपचारातून बरं करण्यासाठी मांत्रिकाने मागितले मागासवर्गीय महिलेचे केस

अहमदनगर- आजारी बहिणीला बरे करायचे असेल तर मागासवर्गीय महिलेच्या डोक्याचे केस घेऊन ये, असा सल्ला देणार्‍या भक्ताचे ऐकून केस मागण्यासाठी गेलेल्या दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष विठोबा निठवे (रा. डिग्रस, ता. संगमनेर) व भाऊसाहेब रामा कुदनर (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

 

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन अधिनियमासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मालुंजे गावच्या परिसरात एक महिला रविवारी आपल्या शेतात गायी चारत असताना सकाळच्या सुमारास दोन इसम तिच्या जवळ आले. त्यांनी सदर महिलेच्या सुनेला काहीतरी विचारणा करून ते निघून गेले. त्यामुळे सदर महिलेने सुनेला विचारले की सदर इसम कशासाठी आले होते. ते दोघे गायी पाहण्यासाठी आले होते असे तिने सांगितले.

 

त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा सदर दोन इसम आले. तिने पुन्हा विचारले असता त्यातील एकाने सांगितले की, माझी बहिण आजारी आहे, एका भक्ताने सांगितले की मागासवर्गीय महिलेचे डोक्याचे केस घेऊन ये. तुम्ही देता का केस? असे सांगताच सदर महिलेने देणार नाही असे सांगितले. त्यामुळे ते दोघे तेथून निघून गेले.

 

त्यानंतर सदर महिलेचा मुलगा सायंकाळी घरी आला. तिने घडलेला प्रकार सांगितला. सदर मुलाची तोंड ओळख असलेला संतोष निठवे याचा सदर महिलेच्या मुलाला फोन आला. त्याने कुठे आहेस असे विचारले तर तो म्हणाला मी घरी आहे. काय काम आहे, त्यावर निठवे याने सांगितले की माझी बहिण आजारी आहे, भक्ताने मला मागासवर्गीय समाजाच्या महिलेच्या डोक्याचे केस आणण्यास सांगितले आहे. तेव्हा तु मला केस घेऊन दे, असे म्हणाल्यावर देतो केस तु ये, असे सदर मुलाने सांगितले. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी दोघे मोटारसायकलहून आले. त्यादरम्यान संबंधीत महिलेच्या मुलाने गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींना फोन करुन घरी बोलावले. फोन झाल्याप्रमाणे ते दोघे आले.

 

उपस्थितीत त्या सर्वांनी ‘त्या’ दोघांना विचारणा केली. त्यावर एकाने सांगितले की, माझी बहिण आजारी आहे, मला भक्ताने मागासवर्गीय महिलेच्या डोक्याचे केस आणण्यास सांगितले आहे. त्यामुळे सदर महिलेचा व तिच्या कुटुंबियांचा अवमान होवून त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. याबाबत सदर महिलेने सोमवारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संतोष विठोबा निठवे (रा. डिग्रस, ता. संगमनेर) व भाऊसाहेब रामा कुदनर (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) या दोघांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन अधिनियम 2013 चे कलम 3(2), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 3(1) (पी), (यू) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button