अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू

अहमदनगर- कारची झाडाला जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू झाला आहे. गणेश सयाजी फुलसौंदर (वय ३५) असे मयत ग्रामसेवकाचे नाव आहे. ते पारनेरकडे येत असताना हा अपघात झाला.

 

यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार, फुलसौंदर हे नगरहून आपले कामकाज आटोपून पारनेरकडे येत होते. हंगे ओलांडून आल्यानंतर आमकडा वस्ती येथे त्यांची कार नियंत्रण सुटून विरूध्द दिशेला जात समोरच्या झाडाला धडकली. ही धडक इतकी जोराची होती की प्रचंड आवाज होऊन आजूबाजूच्या वस्त्यांवरील नागरीक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

 

नागरीक घटनास्थळी पोहचले त्यावेळी फुलसौंदर यांच्या कारचा चक्काचूर झाला होता. त्यांच्या उजव्या हाताला मोठी जखम होऊन ते सिटवर निपचित पडले होते. आ. नीलेश लंके यांचे बंधू दिपक लंके यांनी तरूणांच्या मदतीने फुलसौंदर यांना वाहनाबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या बाजूचा दरवाजा उघडत नसल्याने अखेर विरूध्द दिशेचा दरवाजा तोडून काढून त्यांना बाहेर काढण्यात आले.

 

दरम्यानच्या काळात १०८ रुग्णवाहीकेलाही आगोदरच संपर्क करण्यात आल्याने रूग्णवाहीकाही घटनास्थळी दाखल झालेली होती. त्यांना तात्काळ रूग्णवाहीकेतून पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. हंगेकरांनी मदतीची तत्परता दाखविल्याने फुलसौंदर हे अपघातानंतर थोडयाच वेळात रूग्णालयात पोहचले. परंतू तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता ते गतप्राण झाल्याचे त्यांनी घोषीत केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button