अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: ब्रेक दाबल्याने कार उलटली; एक ठार, आठ जखमी

अहमदनगर- शाळकरी मुलगी अचानक रस्त्यावर आल्याने कारवरील चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार उलटली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला असून मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत.

 

विजय शंकर डेरे (वय-६२,रा.नारायणगाव,जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या कारमधील व्यक्तीचे नाव आहे. रोहित विजय डेरे (वय-२३) , उज्वला विजय डेरे (वय-४८), मोहित विजय डेरे (वय-३०), सविता अनिल शेटे (वय-४८) , शैला दिलीप वारुळे (वय-५८) , विनायक शिवाजी डेरे (वय-५०) (सर्व रा. नारायणगाव ,पुणे), शोभा दशरथ वायाळ (वय-५४, रा. नांदूर,नाशिक) यांसह रस्ता ओलांडणारी शाळकरी मुलगी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय-१२ , सध्या रा. बाळेश्वर आश्रमशाळा, सारोळे पठार, मूळ गाव रा. पाटगाव आळेफाटा पुणे ) गंभीर जखमी झाले आहेत.

 

हा अपघात नाशिक – पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात शुक्रवारी (दि.१८) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.

 

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब हे कार क्रमांक एम.एच.१४ के.बी. ८७१४ मधून नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडा झुडपातून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्यावेळी कार चालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला.

 

कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन ५०० मीटरवर महामार्गाच्या खाली जाऊन थांबली. यात कारचे टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे. कारमधील विजय डेरे यांचा मृत्यू झाला. वैष्णवी मेंगाळ सह कारमधील वरील आठजण गंभीर जखमी झाले.

 

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार अरविंद गिरी,पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, भरत गांजवे,योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. वाहतूक सुरळीत केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button