अहमदनगर ब्रेकींग: कार- दोन दुचाकीच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी

अहमदनगर- कार- दोन दुचाकीच्या धडकेत एका दुचाकीवरील दोघांचा मृत्यू तर दुसर्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवार सकाळी १० च्या सुमारास नगर-दौंड महामार्गावर विसापूर फाटा येथे घडली.
या अपघातात स्नेहालयच्या केडगाव येथील रुग्णसेवा केंद्र प्रकल्पात कार्यरत असलेल्या दोघा स्वयंसेवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सचिन भिमराव काळे (वय ४३, रा.छाया टॉकीज पाठीमागे, तोफखाना) व सरिता भरत कुलकर्णी (वय ३८, रा.सुमन अपार्टमेंट, धर्माधिकारी मळा, बालिकाश्रम रोड) यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये सुरेश साहेबराव कवडे, पोपट तात्याबा साबळे (दोघे रा.कोरेगाव, ता.श्रीगोंदा) यांचा समावेश आहे.
सचिन काळे व सरिता कुलकर्णी हे दोघे श्रीगोंदा येथे एका रुग्णाला भेटण्यासाठी मोटारसायकलवर जात होते. सकाळी १० च्या सुमारास विसापूर फाट्यावर ट्रकला ओहरटेक करताना चुकीच्या दिशेने आलेल्या इंडिका कारने (क्र.एम.एच.२०, बी.वाय.५२५४) त्यांच्या मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली. या धडकेत दोघे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.
त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर त्याच इंडिका कारने त्यांच्या पाठीमागून येणार्या आणखी एका मोटारसायकलला धडक दिली. त्यावरील दोन युवकही जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका बोलावून घेतल्या. चारही जखमींना तातडीने उपचारासाठी नगरल हलविण्यात आले. मात्र नगरला येईपर्यंत यातील सचिन काळे व सरिता कुलकर्णी यांचा रस्त्यातच मृत्यू झाला होता.
मयत सचिन काळे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ भाऊ, भावजया असा परिवार आहे. तर सरिता कुलकर्णी यांच्या पश्चात पती, २ मुले असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच स्नेहालय परिवारावर शोककळा पसरली.
अपघातानंतर इंडिका कार चालकाने कार तेथेच सोडून पलायन केले. बेलवंडी पोलिसांनी सदरची कार ताब्यात घेतली असून कार चालकाचा शोध घेतला जात आहे.