अहमदनगर ब्रेकींग: सात जणांच्या टोळक्याची कांदा व्यापार्याला मारहण

अहमदनगर- घरासमोर दुचाकी लावल्याने झालेल्या किरकोळ वादातून कांदा व्यापारी भगवान झुंबर आव्हाड (वय 42 रा. भगवान बाबा नगर, सारसनगर) यांना सात जणांच्या टोळीने लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत त जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
त्यांनी उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास महात्मा फुले चौकात ही घटना घडली. स्वप्नील ऊर्फ चाचा वारे, महेश राजु गिते, संतोष आहेर, रोहित औसरकर (सर्व रा. चिपाडे मळा, सारसनगर) व तीन अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील वारे याने त्याची दुचाकी आव्हाड यांच्या घरासमोर लावल्याने शनिवारी सकाळी आठ वाजता त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
रविवारी सकाळी आव्हाड हे महात्मा फुले चौकातील मोहटा देवी टी सेंटवर चहा पित असताना तेथे वारे व इतर आले. त्यांनी आव्हाड यांना लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आव्हाड यांच्या खिशातील नऊ हजार 600 रूपये व एक मोबाईल काढून घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.