अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: देव दर्शनाला गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळविले

अहमदनगर- श्रीरामपूर शहरात राहणार्‍या भावी पत्नीला शिर्डी येथे देवदर्शनासाठी घेऊन गेलेला भावी पती मोटारसायकल आणण्यास गेला असता अज्ञात व्यक्तीने भावी पत्नीला पळवून नेल्याची घटना शिर्डी येथील साईबाबा मंदिर परिसरात घडली. सदरची भावी पत्नी अल्पवयीन असून वय पूर्ण झाल्यानंतर त्या दोघांचा विवाह होणार होता.

 

अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण पतीसह मोलमजूरी करून राहातो. आपल्या मुलीचे नात्यातीलच एका मुलाशी लग्न जमले होते. अल्पवयीन असली तरी तिचे वय पूर्ण झाल्यावर आम्ही त्यांचे लग्न लावून देणार होतो. दरम्यान, शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी माझी मुलगी आणि होणारा पती हे श्रीरामपूर येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. सायंकाळपर्यंत ते घरी आले नव्हते.

 

रात्री होणार्‍या पतीचा आम्हाला फोन आला. त्याने सांगितले की, आम्ही शिर्डी येथे आल्यावर मंदिराच्या गेट नं. 4 समोरील पार्कीगमध्ये दुचाकी लावली होती. त्यानंतर आम्ही साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबा मंदिर परिसरात फिरलो.

 

त्यानंतर घरी जायचे म्हणून मी 7.30 वा. होणार्‍या पत्नीस गेट नं. 4 समोर थांबायला सांगून मोटारसायकल आणण्यासाठी गेलो. मोटारसायकल घेवून आलो असता होणारी पत्नी तेथे नव्हती. त्यानंतर तिचा शिर्डी व परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.

 

या फोननंतर मुलीचे आई-वडीलही तिला शोधण्यासाठी शिर्डीत गेले. परंतू शोधूनही ती सापडली नाही. सदरची मुलगी 17 वर्षे 11 महिने वयाची असून ती 12 वी इयत्तेत शिकत आहे. तिच्या अंगात पिवळया रंगाचा टॉप आणि चॉकलेटी रंगाचे जर्किन असून आपल्या मुलीला कोणीतरी अमिषाने व फूस लावून पळवून नेल्याचे या मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button