अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाचा अपघाती मृत्यू; नातेवाईकांना घातपाताचा संशय

अहमदनगर – दुचाकीला म्हशींची धडक बसून झालेल्या अपघातात विवेक विक्रम गायकवाड (वय 26 रा. निलक्रांती चौक) या तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

दरम्यान तरूणाच्या मृत्यूबाबत त्याच्या नातेवाईकांनी शंका उपस्थित केली असून त्याची आई भारती गायकवाड यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, मुलगा विवेकचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने सदर मृत्यूची चौकशी ही अधिकार्‍यांमार्फत झाली पाहिजे. विवेकच्या मृत्यूचे काही साक्षीदार असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी म्हशी मागील मुलांवर संशय व्यक्त केला आहे.

 

मंगळवारी सायंकाळी विवेक हा त्यांच्याकडील दुचाकीवरून मिस्कीन मळा येथून जात असताना तेथे झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याला एका रिक्षा चालकाने खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले आहे.

 

दरम्यान बुधवारी सकाळी विवेकचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनसाठी आणला असता नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.सी. मुजावर, सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस अंमलदार महेश विधाते, बाबासाहेब गुंजाळ, मरकड यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुजावर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button