अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: मध्यरात्री घरावर सशस्त्र दरोडा; हल्ल्यात तिघे जखमी

अहमदनगर- संवत्सर (ता. कोपरगाव) शिवारात शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या वस्तीवर बुधवारी मध्यरात्री 6-7 दरोडेखोरांच्या टोळीने हत्याराचा धाक दाखवून घरात प्रवेश करून घर मालक अनिल सोनवणे यांच्यासह तिघांवर हल्ला करून रोख 15 हजार रुपये व सोने-नाणे अशा चिज वस्तू मिळून अंदाजे 60 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 14 सप्टेंबरच्या रात्री एकच्या सुमारास कोणीतरी आपली खिडकी वाजवत असल्याची कुणकुण लागली. घरमालक अनिल सोनवणे यांना जाग आल्यावर त्यांना खिडकीजवळ तीन-चार संशयित आढळून आले. त्यांनी या संशयितांना याचा जाब विचारला. त्यावर संबंधित दरोडेखोरांना दरडावले मात्र त्यांनी चाकूचा धाक दाखवून घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडलेे. त्यांनी त्यांना विरोध करून पहिला दरवाजा उघडण्यास विरोध केला मात्र ते सहा-सात जणांच्या पुढे कमी पडले. त्यामुळे चोरट्यांनी शस्त्राच्या बळावर घरात प्रवेश करून घरमालक सोनवणे यांच्याशी झटापट केली.

 

त्यात घरमालक सोनवणे यांच्या डोक्यावर जबर मार लागला असून पोटावर चाकूने वार झाले आहेत. अनिल सोनवणे व त्यांची भावजयी सुनीता सोनवणे यांचेसह आई सुगंधाबाई सोनवणे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पायावर चोरट्यानी लोखंडी गजाने मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली आहे.

 

या झटापटीनंतर घरातील अंदाजे 7 हजार रुपये रोख व 22 ग्रॅमचे गंठण, 5 ग्रॅम सोन्याचे बिस्कीट, 5 ग्रॅमची अगठी, 3 ग्रॅमची कानातील रिंग, 2 ग्रॅमचे मंगळसूत्र असे 37 ग्रॅम सोने एकून 1 लाख 11 हजार रुपयांचे सोन्याचे दाणिणे तर 12 ग्रॅमची चैन, दोन तोळे मोहनमाळ असे 96 हजारांचे सोने तर सुनिता बबन सोनवणे यांचे गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे 2 तोळे वजनाचे गंठण, अजिंक्य सोनवणे याचे आधारकार्ड, एटीएम कार्ड असलेले कपाटातील पाकीट, 4 हजार किमतीचा सॅसंग मोबाईल, 500 रुपये किंमतीचा नोकिया मोबाईल, 3 हजार रुपये किमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल असे एकूण 2 लाख 81 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नजीकच्या सोयाबीनच्या शेतात जाऊन उचकपाचक करून त्यातील वस्तू घेऊन पोबारा केला आहे.

 

दरम्यान या घटनेची माहिती गावातील व नजीकच्या शेतकर्‍यांना कळल्यावर त्यांनी वस्तीकडे धाव घेऊन त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते. त्यानंतर त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. ही घटना कोपरगाव शहर पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी सकाळी सातच्या सुमारास दाखल झाले. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आपल्या सहकार्‍यासमवेत घटनास्थळाचा पंचनामा केला. श्वान पथकास पाचारण केले असून संशयितांना शोधण्याची मोहीम सुरु केली आहे.

 

कोपरगाव ठाण्यात फिर्यादी अनिल हरिभाऊ सोनवणे (वय 52) रा. संवत्सर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं. 287/2022 भादंवि कलम 395, 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे संवत्सर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी भेट दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button