अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: पोलिसांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर- सर्वत्र मोठ्या प्रमाणात नदीपात्रांमधून अवैधपणे वाळू तस्करी केली जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडांचा सहभाग असून त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. यातूनच मुजोर झालेल्या वाळू तस्करांनी आज थेट पोलीसांच्या अंगावर डंपर घालत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

 

शेवगावचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील लाडजळगाव परिसरात गस्त घालत असतांना रस्त्यावर उभे असलेले पोलिसांचे खासगी वाहन वाळु तस्करी करणार्‍या डंपरने जोराची थडक देवून उडवल्याचा प्रकार गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडला.

 

या वाहनाजवळ उभ्या असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी बाजुला झाल्याने वाचले. या प्रकरणी डंपर चालक व इतरांवर जीवे मारण्याच्या कलमासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

किशोर शहादेव पवार, बाळासाहेब उर्फ बाळू शहादेव पवार, हनुमान शहादेव पवार यासह इतर चौघे सर्व (रा. गुळज ता. गेवराई) अशी संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल, पो.काँ. बप्पासाहेब धाकतोडे, राहुल खेडकर, चालक होमगार्ड जमीर शेख यांचे पथक खाजगी वाहनाने (क्रमांक एम.एच. 16 सी.वाय – 7927) आज पहाटे 2 ते 5 च्या दरम्यान बीड सरहद्दीवरील सुकळी फाटा ते लाडजळगाव रस्त्यावर मुरमी गावच्या शिवारात तपासणी करत होते.

 

यावेळी पहाटे 5 च्या सुमारास दहा टायर हायवा (क्रमांक एम.एच 23 ए.यु 1975) हे भरधाव वेगाने आले. त्यास थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने ते न थांबवता उभ्या असलेल्या कर्मचार्‍यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. तर उभ्या असलेल्या पोलीसांच्या गाडीस मागील बाजूस धडक देवून भरधाव वेगाने निघुन गेला.

 

त्यानंतर त्या वाहनाचा पाठलाग करत असताना काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहन चालकाने व दुचाकीवर आलेल्या व्यक्तींनी वेळोवेळी अडथळा निर्माण करुन हायवा चालक व वाहनास पळून जाण्यास मदत केली.

 

सदरील वाहन किशोर पवार यांच्या मालकीचे असून ते अवैध वाळू तस्करीसाठी बाळू पवार, हनुमान पवार यांच्या मदतीने चालवून बोलेरो वाहन टेहळणी करण्यासाठी वापरत असल्याचे समजले. चकलांबा ता. गेवराई पोलीसांच्या मदतीने पाहणी केली असता गुळज येथे पवार यांच्या घऱासमोर वाळू वाहतुक करणारे वाहन आढळून आले. मात्र पोलीस आल्याचे कळल्याने सर्वजण पळून गेले. संशयितांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button