अहमदनगर ब्रेकींग: बेपत्ता झालेल्या महिलेचा विहिरीत मृतदेह आढळला

अहमदनगर- सावेडी उपनगरात राहणारी एक महिला सोमवारी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह उपनगरातील कुष्ठधाम रस्त्यावरील एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत जिल्हा रूग्णालयात पाठविला.
उषा राजेंद्र कानडे (वय 50, समता चौक, सिव्हील हाडको, सावेडी) असे या मयत महिलेचे नाव आहे. या महिलेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
उषा कानडे या बेपत्ता झाल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. त्यांचा मुलगा अमोल राजेंद्र कानडे यांनी आई वॉकिंगला गेल्यावर घरी परतली नसल्याची तक्रार दिली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास कुष्ठधाम रस्त्यावरील एका मोकळ्या जागेत असलेल्या विहीरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर यांनी सहकार्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यावर सोमवारी बेपत्ता झालेल्या उषा कानडे या महिलेचा हा मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात शेवविच्छेदनासाठी पाठविला. अधिक तपास पोलीस करत आहेत.