अहमदनगर
अहमदनगर ब्रेकींग: नाल्यात अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर-शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बेवारस मृतदेह आढळण्याचे सत्र सुरू आहे. आता भिंगारनाला परिसरात एका 35 ते 40 वयोगटातील पुरूषाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. आठवडाभरातील बेवारस मृतदेह आढळून आल्याची ही चौथी घटना आहे.
शेंडी गावच्या परिसरात वांबोरी फाट्यानजिक एका तरूणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह शनिवारी आढळून आला होता. त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. त्याच दिवशी नगर तालुक्यातील खडकी येथे एका युवकाचा बेवारस मृतदेह आढळून आला.
मंगळवारी कुष्ठधाम रस्ता परिसरात असलेल्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. आता भिंगारमधील भिंगारनाला परिसरात पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे.